▪️एक एकरात १० टन कलिंगडाचे उत्पादन
▪️डांगमोडेच्या ठाकूर परिवाराचा यशस्वी पॅटर्न.
मसुरे | झुंजार पेडणेकर :
शेतीकडे जेव्हा केवळ व्यवसाय म्हणून न पाहता एक ‘कौटुंबिक यज्ञ’ म्हणून पाहिले जाते, तेव्हा मातीतून सोनं पिकणं निश्चित असतं. अशाच एका जिद्दीची आणि कौटुंबिक एकोप्याची ही यशोगाथा आहे.घाम जेव्हा नात्यांच्या ओलाव्याने गाळला जातो, तेव्हा शिवारात कष्टाचं गोड फळ लगडतं! आजच्या काळात जिथे एकत्र कुटुंब पद्धती दुर्मिळ होत चालली आहे, तिथे मालवण तालुक्यातील मसुरे – डांगमोडे येथील एका शेतकरी कुटुंबाने ‘एकमेका सहाय्य करू’ या उक्तीचा प्रत्यय आणून दिला आहे. दुसऱ्यांच्या जमिनीत तीन भावानी आणि त्यांच्या पत्नींच्या जिद्दीवर या कुटुंबाने कलिंगडाचे नंदनवन फुलवले आहे. बाहेरचा एकही मजूर न लावता, रक्ताच्या नात्यांनी मातीत घाम गाळून पिकवलेल्या या ‘कौटुंबिक शेती’चा हा विशेष रिपोर्ट…….
▪️कुटुंबाच्या मेहनतीने नफा वाढला –
येथील पांडुरंग ठाकूर आणि त्यांचे बंधू देविदास आणि दीपक शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. लॉकडाऊन मध्ये मोठा तोटा सहन करावा लागल्याने त्यानी कलिंगड शेती करणे बंद केली होती. परंतु या हंगामात मात्र त्यांनी कलिंगड पीकविण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी सुद्धा केला. यामध्ये त्यांना त्याच्या परिवारातील सौ देविका देविदास ठाकूर , सौ नम्रता दीपक ठाकूर, सौ पूजा पांडुरंग ठाकूर आणि पुढच्या पिढीतील सार्थक आणि आराध्य ठाकूर यांचे मोठे योगदान लाभले. अख्या कुटुंबानेच झोकून देऊन मेहनत घेतल्याने मजुरी वर जाणारा खर्च वाचताना नफ्यात सुद्धा वाढ झाली आहे.
▪️रोप न लावता बीयांची लागवड –
स्वतःचा आराध्य डेअरी फार्म नावाने डेअरी प्रॉडक्ट व्यवसाय असलेल्या पांडुरंग ठाकूर यांनी 70 दिवसात तयार होणारे ‘ ऑगस्टा ‘ या जातीचे कलिंगड बी एक एकर क्षेत्रामध्ये 10 जानेवारीला लावले. बरेच शेतकरी ही रोप मागवून त्याची लागवड करतात परंतु ठाकूर यांनी रोप न मागवता बिया जमिनीत रुजविल्या. त्यामुळे त्यांचा फायदा सुद्धा झाला आहे. एक रोप बाजारात तीन रुपयांना पडते परंतु 800 बिया असलेल्या एक पॉकेट एक हजार रुपयापर्यंत बाजारात मिळते. त्यामुळे सुरुवातच त्यांची पैसे वाचवण्यापासून झाली. रोप लागवड केल्यास ती 90% जगतात परंतु ज्यावेळी आपण बिया लावतो त्यावेळी काही बियांची उगवण होत नाही. म्हणून या उगवण न झालेल्या ठिकाणी पुन्हा आपल्याला वेली लावाव्या लागतात. यासाठी एका वेगळ्या ट्रेमध्ये त्यांनी सुमारे पाचशे बिया रुजत घातल्या होत्या.
▪️शेणखताचा वापर वेलिंसाठी फायद्याचा –
मल्चिंग पेपरवर त्यांनी प्रथमच ही लागवड केल्यामुळे त्यांना उत्पन्न सुद्धा चांगले मिळाले आहे. ठाकूर यांच्या घरीच गोधन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर त्यांनी ही जमीन तयार करताना केला. आणि याचा फायदा सुद्धा त्यांना या कलिंगड लागवडीमध्ये झालेला आहे. कारण उन्हामुळे कलिंगड वेली लवकर कोमेजतात. परंतु शेणखत असल्यामुळे हे वेल कोमेजण्याचे प्रमाण फार कमी झाले. तसेच फळांमध्ये गोडी सुद्धा इतर फळांपेक्षा जास्त आहे असे ठाकूर सांगतात. नवीन नवीन रोग ह्या कलिंगडांवर येत असल्यामुळे त्याच्यासाठी औषधांचा खर्च सुद्धा त्यांना सुमारे दहा हजार रुपयापर्यंत आलेला आहे. यासाठी त्यांना मसूरे येथील माजी उपसरपंच व कलिंगड शेतकरी राजेश गावकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचं ते सांगतात.
▪️दहा टन कलिंगड पीक हाती आले –
कलिंगड बी लागवड केल्यानंतर ती उगवण होत असताना तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन तुडतुडे वेल तोडून टाकतात. याचवेळी वेलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.कारण कलिंगड पिकांमधील फायदा तोटा हा पहिल्या पंधरा दिवसातच निश्चित होतो. यावेळी त्यांना एक एकर मधून दहा टन कलिंगड मिळाली आहेत. कुडाळ येथील व्यापाऱ्याने सुमारे आठ टन कलिंगड त्यांच्याकडून 12 रुपये किलो या दराने खरेदी केली आणि इतर दोन टन कलिंगड होती ती त्यांनी स्वतः विकली आहेत. तोडणीस थोडासा उशीर झाल्यामुळे त्यांना रेट कमी मिळाल्याचे ठाकूर सांगतात. खतांचा नियंत्रित वापर आणि योग्य जोपासना यामुळे याची गुणवत्ता फळांमध्ये दिसून आली आणि यांच्या बागेतील सर्व फळे हे आठ किलो ते पंधरा किलो या वजनामध्ये तयार झाली. मोठ्या फळांना रेट सुद्धा चांगला मिळाला आहे.
▪️ठाकूर कुटुंबाचा आदर्श शेतीपाठ
शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी पांडुरंग ठाकूर यांचे कुटुंब एक आदर्श वस्तुपाठ ठरले आहे. भांडवल कमी आणि कष्ट जास्त हे सूत्र हाताशी धरून या कुटुंबाने कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे, मजुरीवर होणारा मोठा खर्च वाचवण्यासाठी घरातील तिन्ही भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनी स्वतःला शेतात झोकून दिले आहे. व्यवस्थापन कौशल्याची आणि कौटुंबिक श्रमाची जोड मिळाल्यामुळे या कलिंगड शेतीला आज एक वेगळीच गोडी प्राप्त झाली आहे. या कुटुंबाने केवळ कलिंगड लावले नाहीत, तर त्यात विश्वासाची आणि कष्टाची पेरणी केलीआहे. कडक उन्हात रसाळ कलिंगडं पिकवणाऱ्या या कुटुंबाची ही गोष्ट आजच्या पिढीला शेतीकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही! पांडुरंग ठाकूर यांना 9420206919 या नंबर वर संपर्क साधून इच्छुक शेतकरी मार्गदर्शन घेऊ शकतात.













