एआयच्या युगातही पुस्तकांशी नाते जोडल्यास व्यक्तिमत्व विकास : तहसीलदार श्रीधर पाटील 

कलंबिस्त हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तुम्हाला सर्वकाही लिहून देऊ शकते, मात्र स्वतः वाचन आणि लेखन करणे हे थेट आपल्या भावनांशी जोडलेले असते. एआय जे काही देते ते कृत्रिम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून जीवनात जे अनावश्यक आहे ते ‘डिलीट’ करायला शिकावे. जेव्हा तुम्ही मोबाईल स्वतःपासून दूर कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास होईल, असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कलंबिस्त येथे केले.

कलंबिस्त इंग्लिश स्कूल व हायस्कूल येथे महा-ई-सेवा केंद्र आणि कलंबिस्त हायस्कूलच्या वतीने आयोजित ग्रंथालय पुस्तक वाचक निबंध लेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत, सहसचिव चंद्रकांत राणे, जिल्हाध्यक्ष सुनील खरात, संदेश कल्याणकर, ॲड. संतोष सावंत, प्रथमेश सावंत, सुरेश राऊळ, वसंत सावंत, सूर्यकांत राजगे, रमेश सावंत, सीमा मठकर, सुशील आमोणेकर, मंडल अधिकारी श्रीमती गोरे, तलाठी नमिता कुडतरकर, रवींद्र म्हापसेकर, सुभाष राऊळ, प्रमोद नाईक, भाई सावंत, रूपा सावंत आणि मुख्याध्यापक अभिजित जाधव उपस्थित होते.

तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की, समाजात आज भोंदू महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची फसवणूक करत आहेत. अशा वेळी सजग व्हायचे असेल, तर शैक्षणिक प्रगती आणि अवांतर वाचन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी ‘श्यामची आई’ सारखी पुस्तके वाचून त्यावर निबंध लिहिले, ही कौतुकास्पद बाब आहे. यावेळी ॲड. संतोष सावंत यांनी सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दरवर्षी ‘माझा सैनिकी गाव’ या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली.

स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे:

लहान गट: प्रथम- कु. कीर्ती राऊळ, द्वितीय- कु. अनुराधा कदम, तृतीय- लक्ष्मण राऊळ, उत्तेजनार्थ- धोंडी नाईक.

मोठा गट: प्रथम- कु. समीक्षा गुरव, द्वितीय- कु. श्रृती राऊळ, तृतीय- कु. ऋतुजा सावंत, उत्तेजनार्थ- कु. हर्षिता पास्ते.

या कार्यक्रमात शाळेच्या १९९२-९३ च्या बॅचतर्फे फॅन भेट देण्यात आला, तर महादेव मेस्त्री यांनी रोख देणगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी केले, सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभार विलास चव्हाण यांनी मानले.