रत्नागिरी: “एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवूया!” या जिद्दीने महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आता कर्करोगाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. वाढत्या असंसर्गजन्य आजारांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, सध्या होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ६३% मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होत आहेत. यामध्ये कर्करोगाचा वाटा ९% इतका असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. ग्लोबलकॅन (Globocan) २०२० च्या सर्वेक्षणानुसार भारतात कर्करोगाचे १३ लाख २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर, कर्करोगाचे वेळीच निदान करून त्यावर उपचार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ मोहीम राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतात. बदललेली जीवनशैली आणि अयोग्य सवयींमुळे ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ०८ एप्रिल ते ११ मे २०२६ या कालावधीत ही फिरती व्हॅन प्रत्येक तालुक्यात पोहचणार आहे. या अत्याधुनिक वाहनामध्ये दंतशल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत मुख, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच गरज पडल्यास रुग्णांना प्राथमिक उपचार आणि पुढील उपचारांसाठी संदर्भीय सेवाही पुरवण्यात येतील.
या मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, ०८ ते ११ एप्रिल दरम्यान संगमेश्वर येथे या मोहिमेला सुरुवात होईल. त्यानंतर १३ ते १६ एप्रिल चिपळूण, १७ ते २० एप्रिल खेड, २१ ते २२ एप्रिल मंडणगड, २३ ते २५ एप्रिल दापोली, २७ ते २९ एप्रिल गुहागर, ३० एप्रिल ते ४ मे रत्नागिरी आणि ५ ते ७ मे दरम्यान लांजा येथे ही व्हॅन उपलब्ध असेल. मोहिमेचा समारोप ८ ते ११ मे दरम्यान राजापूर तालुक्यात होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि संशय असल्यास आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रामस्थांनी जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा किंवा आरोग्यविषयक सल्ल्यासाठी टोल-फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.












