महामार्गावर कुत्रा आडवा आल्याने कारचा भीषण अपघात

दुभाजक ओलांडून गाडी दुसऱ्या मार्गावर कोसळली

सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले
​

सावंतवाडी | प्रतिनिधी :मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीला मळगाव जोशी मांजरेकरवाडी सर्कलजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट दुभाजक (डिवायडर) ओलांडून पलीकडच्या मार्गावर जाऊन कोसळली. या भीषण अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने चालक आणि प्रवासी बालबाल बचावले आहेत.
​ ​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी गाडी कुडाळवरून गोव्याच्या दिशेने जात होती. मळगाव येथील जोशी मांजरेकरवाडी सर्कलच्या परिसरात गाडी आली असता, अचानक एक कुत्रा धावत गाडीसमोर आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक जोरात ब्रेक लावला. मात्र, वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
​दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला झेप
​नियंत्रण सुटलेली ही गाडी महामार्गावरील दुभाजकाला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की, गाडी दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन कोसळली. सुदैवाने, ज्यावेळी ही गाडी दुसऱ्या मार्गावर आली, तेव्हा समोरून दुसरे कोणतेही वाहन येत नव्हते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​ ​या अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचा आणि डाव्या बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गावर भटक्या जनावरांचा आणि कुत्र्यांचा वावर वाढल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.