खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायतीमध्ये जीईएम (GeM) पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा तसेच विविध विकासकामांमध्ये अनियमितपणा झाल्याचा आरोप पुढे आल्याने या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी संबंधित तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या निर्णयानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदेश पेवेकर यांनी खेड पंचायत समितीसमोर सुरू केलेले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. धामणदिवी ग्रामपंचायतीत जीईएम पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा तसेच विकासकामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पेवेकर यांनी केली होती.
या मागणीसाठी त्यांनी ७ एप्रिल २०२६ पासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी अधिकृत पत्राद्वारे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, सध्या पंचायत समिती चिपळूण येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले. हे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाल्यानंतर सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. रेवती पाटील व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची प्रत संदेश पेवेकर यांना देण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनीही या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी खेड यांना चौकशीचे आदेश दिले होते. दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत पेवेकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिल्याने संबंधित प्रकरणात ठोस कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












