शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करूनच युवा मोर्चाचे कार्यक्रम :माजी आमदार अजित गोगटे

गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

देवगडमध्ये खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उपक्रम

देवगड : माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामागे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘शेवटच्या घटकाचा विचार’ या तत्वाचा प्रभाव दिसून येतो, असे मत माजी आमदार अजित गोगटे यांनी व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ७५ जणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजपा देवगड तालुका युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, संतोष किंजवडेकर, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, योगेश पाटकर नगरसेवक चंदू कावले, उमेश कनेरकर, प्रकाश गोगटे, निनाद देशपांडे, संजय तारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी संदीप साटम यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले की, जनसेवेचा घेतलेला वसा सातत्याने चालू ठेवला तर यश नक्कीच मिळते. लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्यास कोणत्याही क्षेत्रात अपयश येत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संतोष किंजवडेकर यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमादरम्यान देवगडमधील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले, कार्यक्रमाचे  प्रास्ताविक दयानंद पाटील यांनी केले आभार पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर यांनी मानले