देवरूख शहर विकास आराखड्यावर १७ रोजी नागरिकांशी थेट संवाद

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची मते आणि समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल रोजी देवरुख येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मा. आमदार शेखरजी निकम हे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

सदर बैठक देवरुख नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११.०० वाजता होणार असून, शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी आपली मते, सूचना तसेच समस्या थेट आमदारांच्या समक्ष मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. देवरुख शहराच्या भविष्यातील विकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करत, या बैठकीस शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे. या बैठकीमुळे शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा होऊन विकास आराखडा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.