रत्नागिरी जिल्हयातील एकही शाळा बंद पडू देणार नाही; पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ चंदूभाई देशपांडे यांना पालकमंत्र्यांचे ठोस आश्वासन

राजापूर (वार्ताहर): कोकणातील दुर्गम भागातील गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि जिल्ह्याचा शैक्षणिक वारसा अखंडपणे जपला जावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतीही शाळा बंद पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील येळवण येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते चंदूभाई देशपांडे यांनी नुकतीच पालकमंत्र्यांची भेट घेऊन शाळांच्या प्रश्नावर चर्चा केली, यावेळी ते बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात अनेक शाळा कमी पटसंख्येमुळे अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर, कोणतीही शाळा बंद पडू नये, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊन त्यांचे नुकसान होऊ नये आणि शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत, अशी मागणी चंदूभाई देशपांडे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. दुर्गम भागातील गोरगरीब मुलांसाठी शाळा हेच प्रगतीचे एकमेव साधन असल्याने शिक्षकांना आहे तिथेच ठेवून शैक्षणिक सातत्य टिकवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

या मागणीचा गांभीर्याने विचार करून पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, शासन शिक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे सकारात्मक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून शाळा बंद होण्याबाबत तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल आणि शिक्षकांच्या नियुक्तीबाबतही समन्वयाची भूमिका घेतली जाईल. पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

या भेटीदरम्यान चंदूभाई देशपांडे यांच्यासोबत सुहास आयरे, ,तसेच ग्रामीण समाज प्रबोधिनी येळवण संस्थेचे सहकार्यवाह संभाजी केळुस्कर यांनीही या चर्चेत सहभाग घेऊन ग्रामीण भागातील शाळांच्या वास्तव स्थितीची माहिती दिली.