लाहोर शेड धान्य गोदाम इमारतीचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

खेड (प्रतिनिधी) : तीन वर्षांपूर्वी धो धो कोसळणाऱ्या पावसात केसळलेल्या लाहोर शेड धान्य गोदाम इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री योगेश कदम हस्ते संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या धान्य साठवणुकीसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. साठवण व्यवस्थेमुळे शेतमालाचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नाबार्ड गोदाम बांधणी योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ३६९.७१ चौरस मीटर क्षेत्रफळावर ही इमारत बांधण्यात येणार असून १ वर्षात या इमारतीची उभारणी पूर्ण करण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या या गोदामामुळे खेड तालुक्याच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. ग्रामीण भागातील विकासाला गती देत, शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.