निरवडे ग्रामविकास अधिकारी प्रविण पोलेला अटकपूर्व जामीन मंजूर

​सावंतवाडी:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या निरवडे येथील ग्रामविकास अधिकारी प्रविण दिलीप पोले यांना ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड. वामन गवस यांनी काम पाहिले.

​तक्रारदाराच्या बहिणीच्या नावातील आडनाव दुरुस्तीचे काम सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून निरवडे सजाच्या तलाठी कार्यालयाकडे आले होते. हे काम करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी तथा तलाठी प्रविण पोले यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतल्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान, २ हजार रुपयांवरून तडजोड होऊन १ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

​लाचलुचपत विभागाने यासाठी सापळा रचला होता. मात्र, प्रत्यक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीने सावध पवित्रा घेत पैसे स्वीकारले नाहीत, ज्यामुळे सापळा कारवाई यशस्वी होऊ शकली नाही. तरीही पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्याचे निष्पन्न झाल्याने, पोले यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.