रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचा होणार कायापालट; आ. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, ५ कोटींचा निधी मंजूर!

रत्नागिरी:
कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख सात समुद्रकिनाऱ्यांवर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यापैकी उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय ३१ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी ‘सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर’ आणि ‘चेंजिंग रूम’ बांधण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण १३ टॉयलेट युनिट्स आणि १३ चेंजिंग रूमचा समावेश आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खालील सात पर्यटन स्थळांवर ही कामे केली जाणार आहेत:
भाट्ये बीच (रत्नागिरी): २ इको टॉयलेट आणि २ चेंजिंग रूम.

गणपतीपुळे बीच (रत्नागिरी): ३ इको टॉयलेट आणि ३ चेंजिंग रूम.

गणेशगुळे बीच (रत्नागिरी): १ इको टॉयलेट आणि १ चेंजिंग रूम.

गावखडी बीच (रत्नागिरी): १ इको टॉयलेट आणि १ चेंजिंग रूम.

वेळणेश्वर बीच (गुहागर): २ इको टॉयलेट आणि २ चेंजिंग रूम.

लाडघर बीच (दापोली): २ इको टॉयलेट आणि २ चेंजिंग रूम.

मुरुड बीच (दापोली): २ इको टॉयलेट आणि २ चेंजिंग रूम.

या प्रकल्पासाठी एकूण ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यापूर्वी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपये (२०%) वितरीत करण्यात आले होते. आता उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हे काम विहित अटी व शर्तींचे पालन करून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
रविंद्र चव्हाण यांच्या या प्रयत्नांमुळे रत्नागिरीतील पर्यटनाला नवी झळाळी मिळणार असून, पर्यटकांच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.