खेड (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खेड शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जिजामाता उद्यानातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. यावेळी परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
या प्रसंगी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेवक तथा गटनेते रहिम सहिबोल, नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, माजी नगराध्यक्षा सौ. उर्मिला पाटणे-शेट्ये, नगरसेविका सौ. स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के, विजय गुप्ता आणि इतर कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात असून या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













