दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील हर्णे रस्त्यावर रविवारी, १२ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आसूद बाग बसस्टॉपजवळ भीषण अपघाताची घटना घडली. वळणावर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्णेकडून दापोलीकडे येणारी एक कार अतिवेगात होती. आसूद बाग बसस्टॉपजवळील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार समोरून येणाऱ्या दापोलीकडून हर्णेकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारवर जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


अपघातग्रस्त दोन्ही कार पर्यटकांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. एक कार कोल्हापूर येथून, तर दुसरी सातारा येथून आलेल्या पर्यटकांची होती. यापैकी एका कारमध्ये प्रवास करणारे संपूर्ण कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता कोणतीही जीवितहानी न होणे ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण, वाहनांचा वेग आणि चालकांची निष्काळजीपणा याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











