नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केली पाहणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, वीज, आणि परिसर स्वच्छतेसह नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व समस्या तात्काळ दूर केल्या जातील, अशी ग्वाही सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय मोठा असून, त्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून सोडवता येण्यासारख्या विविध तांत्रिक आणि भौतिक अडचणींकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. रुग्णालयातील पाणीपुरवठा, पोस्टमार्टम रूमकडील पथदीप, आणि परिसरातील झाडीझुडपे तसेच स्वच्छता या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षा म्हणाल्या की, रुग्णालयातील समस्यांचा सविस्तर आढावा घेतला असून, येत्या बुधवारी या संदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. रुग्णांची आणि नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. झाडी कटिंग आणि विद्युत व्यवस्थेचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. पाणीपुरवठा बिलासंदर्भात रुग्णालयाला तांत्रिक अडचण असून, त्यावरही बैठकीत तोडगा काढला जाईल. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर विभागांशी संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते देखील सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या पाहणी दौऱ्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवी जाधव, उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य राजू केळुसकर, संजय लाड, एन. बी. रेडकर, जितेंद्र मोरजकर, संपत दळवी यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










