खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित राज्यस्तरीय सिंधूरत्न भूषण कबड्डी चषक स्पर्धेत भरणे येथील अनिकेत स्पोर्ट क्लबने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने जय मानसेश्वर कबड्डी संघ, वेंगुर्ला यांच्या वतीने ही भव्य स्पर्धा १३ एप्रिल २०२६ रोजी पार पडली.
या स्पर्धेत राज्यभरातील एकूण १६ नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत उपांत्य फेरीत स्वराज्य स्पोर्ट क्लब, चिपळूण या बलाढ्य संघावर मात केली आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात एस. एम. स्पोर्ट्स क्लब, कुडाळ या संघाविरुद्ध अत्यंत अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनिकेत स्पोर्ट क्लबने ३० विरुद्ध २५ अशा फरकाने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत उत्कृष्ट पकडीसाठी कुमारी समरीन बुरोंडकर हिला गौरविण्यात आले, तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धी चाळके हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघातील राष्ट्रीय खेळाडू कुमारी तस्मिन बुरोंडकर, सायली शिंदे, सलोनी महाडिक, वंशिका कांचावडे, वैशाली जाधव, समीक्षा शिंदे, जानवी शिंदे, श्रावणी जाधव आणि मनीषा राठोड यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या यशानंतर पंचक्रोशीतून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच नूतन खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे आणि कार्याध्यक्ष महेश शेठ भोसले यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सौ. तेजा बैकर, श्री सुभाष आंबेडे, श्री दाजी राजगुरू, श्री विलास बेंद्रे आणि श्री सुजित फागे यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.









