सावंतवाडी शाळा नं. ४ च्या वीरा घाडीची ‘इस्रो’ विमान दौऱ्यासाठी निवड

जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेच्या १० विद्यार्थ्यांचे झळाळते यश

‘एसटीएस’ परीक्षेत यशाची परंपरा कायम

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘सिंधू रत्न टॅलेंट सर्च’ (STS) परीक्षेत सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. वीरा घाडी हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून शाळेची ‘टॉप ५’ मध्ये येण्याची देदीप्यमान परंपरा अखंड राखली आहे. तिची या यशाबद्दल ‘इस्रो’ विमान दौऱ्यासाठी निवड झाली असून, शाळेच्या एकूण १० विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत (टॉप ५०) स्थान मिळवून जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

सावंतवाडी शहरातील ही शाळा केवळ एक सरकारी शाळा नसून गुणवत्तेचा एक ‘ब्रँड’ म्हणून ओळखली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एसटीएस’ परीक्षेच्या निकालात शाळेने सर्वच स्तरावर यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय टॉप ५० च्या यादीत इयत्ता सातवीतून सोहम सुधीर गावडे, शौर्या निलेश गंगावणे, शौर्या भास्कर गावडे आणि साईराज राजन परब यांनी स्थान मिळवले आहे. तर इयत्ता सहावीतून वीरा राजीव घाडी (जिल्ह्यात तृतीय), शौर्य विजय चाळूचे, हार्दिक अनिल वरक, पार्थ अशोक बोलके, मानवी महेश घाडी आणि स्वरा गोविंद शेर्लेकर यांनी यश संपादन केले आहे.

*इस्रो दौऱ्याचे स्वप्न साकार*

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी या शाळेचा किमान एक विद्यार्थी इस्रो दौऱ्यासाठी पात्र ठरतो, ही विशेष बाब आहे. यंदा वीरा घाडी हिने हे यश खेचून आणले आहे. तसेच इयत्ता पाचवीसाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेतही शाळेच्या पाच मुलांची निवड झाली आहे. यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी याच शाळेचे होते, यावरून शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जाची प्रचिती येते.

*शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्य*

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांना लाभलेले मार्गदर्शक शिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे. स्पर्धा परीक्षेचे योग्य नियोजन, सराव आणि शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा मोठ्या व्यासपीठावर चमकत असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेचा एक नवा आदर्श या शाळेने समोर ठेवला आहे.