आंबयेच्या सुपुत्राचा मानाचा सन्मान; अनंत धोत्रे यांना राष्ट्रपती पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील आंबये गावचा सुपुत्र अनंत भिवाजी धोत्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील अग्निशमन दलात सब ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या धोत्रे यांनी आपल्या धाडसी आणि निष्ठावान सेवेमुळे हा मानाचा बहुमान प्राप्त केला आहे.
धोत्रे यांनी सेवाकाळात अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये धाडसाने काम करत नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आग, दुर्घटना आणि इतर संकटांच्या प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांच्या कार्यामुळे अग्निशमन दलाची प्रतिमा उंचावली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सन्मानामुळे आंबये गावासह संपूर्ण खेड तालुक्याचा मान उंचावला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून धोत्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.