सातार्डा येथील चंद्रावती पवार यांचे निधन
सावंतवाडी : सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी व माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (वय ७९) यांचे मंगळवारी पहाटे ६.३५ च्या सुमारास निधन झाले.
अतिशय प्रेमळ आणि कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी निःस्वार्थपणे झटत प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या मायेच्या सावलीत वाढलेला परिवार आज त्यांच्या जाण्याने अक्षरशः पोरका झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जोडून ठेवणारा तो धागाच जणू आज तुटला आहे. त्यांच्या शांत, संयमी स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात कायमच आदराचे स्थान मिळवून होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सातार्डा येथील तरचावाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.











