आंजर्लेतील कड्यावरच्या गणपती मंदिरात दानपेटी फोडून चोरी; भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

दापोली (विशेष प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे असलेल्या प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली असून चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे अंदाजे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंजर्ले येथील रहिवासी व एलआयसी एजंट विजय गणेश निजसुरे (वय ५९) यांनी या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित चोरटे पहाटे सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात प्रवेश करताना दिसले. त्यांनी निळ्या रंगाचे फुलहाताचे जॅकेट, काळी पँट, पांढऱ्या-काळसर रंगाचे बूट, डोक्यावर कानटोपी आणि तोंडावर मास्क असा वेष परिधान केला होता.
चोरट्यांपैकी तिघांनी लोखंडी हत्याराच्या सहाय्याने मंदिराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सभामंडपातील स्टीलची दानपेटी उचलून ती मंदिराजवळील शिवमंदिरासमोरील त्रिपुराच्या मागील बुरुजाजवळ नेली. तेथे दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि दोन स्टीलचे लॉकर चोरून नेण्यात आले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये दानपेटीतील सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम असून त्यात ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांसह विविध मूल्यांची नाणी होती. तसेच अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे दोन स्टील लॉकरही चोरट्यांनी लंपास केले असून एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
या चोरीतील महत्त्वाचा धागा म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून संशयितांची ओळख पटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्यामुळे या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळी चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.