खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव येथे ‘From Classroom English to Real Communication’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. केंब्रिज युनिव्हर्सिटी, लंडनच्या केंब्रिज असेसमेंट इंग्लिश या संलग्न विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश इंग्रजी विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी, कृतीयुक्त आणि विद्यार्थ्यांना सहज समजणारे कसे बनवता येईल, याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. प्राध्यापक कॅरमेलीन सिक्वेरिया आणि डॉ. अर्चना गायकवाड यांनी विविध उपक्रम, संवाद पद्धती आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून इंग्रजी शिकवण्याच्या आधुनिक व मनोरंजक पद्धती स्पष्ट केल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना इंग्रजी संवाद कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत झाली.
कार्यक्रमादरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ‘PET for Schools’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यशाळेत खेड व परिसरातील रोटरी स्कूल, एल. टी. टी. स्कूल, एम. आय. बी. गर्ल्स स्कूल, ज्ञानदीप सीबीएसई स्कूल तसेच ज्ञानदीप भडगाव येथील सुमारे २५० विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध कृतींमध्ये मनापासून भाग घेतला आणि इंग्रजी शिकण्याचा आनंद अनुभवला.
या यशस्वी उपक्रमासाठी संस्थेचे सल्लागार श्री. बापट सर, ज्ञानदीप कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. बागल सर, ज्ञानदीप विद्या संकुल भडगावचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री. मगदूम सर तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मोरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, तसेच विश्वस्त, संस्थापक सदस्य व ज्ञानदीप परिवारातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.










