खेडमध्ये उबाठाला मोठा धक्का; शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. घेरारसाळगड गावातील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील भरणे नाका येथील शिवसेना पक्ष कार्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात श्री. रामचंद्र बाबू आखाडे, श्री. धोंडीराम बाबू आखाडे, श्री. रामचंद्र दिनकर सावंत आणि श्री. सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करत पक्षाशी बांधिलकी व्यक्त केली. विकासाभिमुख भूमिका आणि परिवर्तनवादी विचारधारेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामचंद्र आखाडे हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुकवली जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आता इथून पुढे तुमच्या विकासाची जबाबदारी ही आमची असेल कोणत्याही प्रकारच्या विकास कामांना कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळेस प्रवेश कर्त्यांना दिली.