सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची पहिली सभा दे धक्का ठरली!
सिंधुदुर्गनगरी | बाळ खडपकर
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी अक्षरशः “दे धक्का” ठरली! नवख्या सदस्यांचा उत्साह आणि अनुभवी सदस्यांचा धारदार अनुभव यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. प्रशासनाला प्रश्नांच्या भडिमाराने अक्षरशः कोंडीत पकडत सदस्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
“पहिलीच सभा, पण सदस्यांची अभ्यासपूर्ण ताकद प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अनुभवली.
दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या सभेसाठी ५० पैकी जवळपास ४० नवखे सदस्य सभागृहात दाखल झाले होते. पहिल्याच सभेची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
उपाध्यक्ष तुकाराम साहिल, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, बांधकाम व वित्त सभापती संतोष साठविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष प्रमोद कामत विराजमान झाल्यानंतर सभेला प्रारंभ झाला. सभेची सुरुवातही यावेळी वेगळीच ठरली. ‘वंदे मातरम’, ‘जनगणमन’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतांनी सभागृह दणाणून गेले.
“अनुभवी खेळाडू मैदानात – प्रशासन बचावात!”
माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, संदेश सावंत, सुमेधा पाताडे, तसेच माजी सभापती सावी लोके, सुनिता घाडीगावकर, संजय बोबडी हे जणू अनुभवी फलंदाजांसारखे पहिल्या रांगेत सज्ज होते. त्यांनी प्रशासनाला टिपिकल ‘गुगली’ टाकत विषय पुढे ढकलण्याच्या सूचना देत नियंत्रण ठेवले.
“मायकलचा सिक्सर, गावडेंचा चौकार!”
विषयपत्रिकेवरील २२ विषयांचे वाचन सुरू होताच सदस्य मायकल फर्नांडिस यांनी थेट आक्षेप घेत प्रशासनाला अडचणीत आणले. “तपशील द्या!” अशी ठाम मागणी करत त्यांनी जणू पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकला.त्यांना साथ देत संदीप गावडे यांनीही चौकार लगावत प्रशासनावर दबाव वाढवला.बीसभागृहातील एसी बंद, व्हेंटिलेशनचा अभाव या मुद्द्यांवर मायकल फर्नांडिस यांनी जोरदार फटकेबाजी केली, तर रुपेश पावस्कर आणि राजन चिके यांनी “माईक बंद – आवाज बंद!” अशी परिस्थिती उघड करत प्रशासनाला क्लीन बोल्ड केले.
“आयत्या विषयांत खऱ्या अर्थाने फायरिंग!”
आयत्या वेळच्या विषयांत तर जणू रणांगण पेटले!
मनोज रावराणे, सुप्रिया वालावलकर, संदीप गावडे, गणेश राणे, सुनील पारकर, रुपेश कानडे, दीपक नारकर यांनी एकापाठोपाठ एक प्रश्नांचा मारा सुरू केला. संदीप गावडे – रस्त्यांच्या मुद्द्यावर अभ्यासू ‘विश्लेषक ठरले. सुमेधा पाताडे यांनी शिष्यवृत्ती व क्रीडा विषयावर ‘प्रश्नांची मशीनगन सुरू ठेवल्यामुळे वातावरण आणखी तंग बनले. रुपेश कानडे यांनी पुरवठा व शिक्षणावर ‘धडाकेबाज प्रशांत बाबत चर्चा घडवली.
आरोग्य विभागावर तर सदस्यांनी असा हल्ला चढवला की अधिकारी अक्षरशः बचावात्मक झाले. औषध वाटप, सुविधा यावर तुफानी चर्चा रंगली.
रुपेश कानडे, संदीप गावडे, प्रमोद रावराणे, संदेश सावंत, संजय गावडे, गणेश राणे यांनी प्रश्नांचा अक्षरशः “सर्जिकल स्ट्राईक” केला. शेवटी या प्रश्नावर अध्यक्ष प्रमुख कामत यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आरोग्य विभागाला दोन-चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’ दिला. तसेच प्रतिनिधी पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. संदेश सावंत यांनी “सभागृहाला हलक्यात घेऊ नका” असा ठणकावून इशारा दिला.
“औरंगाबाद वाद – सभागृहात ठिणगी!”
एका महिला अधिकाऱ्याने “औरंगाबाद” असा उल्लेख करताच सभागृहात ठिणगी पडली.
सदस्य रामा गवस यांनी आक्रमक भूमिका घेत “छत्रपती संभाजीनगर म्हणा!” अशी मागणी केली. काही सदस्य उभे राहताच वातावरण तापले.
शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागत “छत्रपती संभाजीनगर” असा उल्लेख केल्यावर वाद शांत झाला.
“नवखे पण अभ्यासपूर्ण – प्रशासन हादरले!”
एकूणच, नवखे सदस्य जणू पहिल्याच सामन्यात फॉर्मात आलेले खेळाडू ठरले, तर अनुभवी सदस्यांनी त्यांना अचूक मार्गदर्शन करत प्रशासनाला घाम फोडला. ही सभा म्हणजे केवळ बैठक नव्हे, तर “प्रशासन विरुद्ध सदस्य” असा थरारक सामना ठरला… आणि या सामन्यात सदस्यांनी प्रशासनाला जोरदार “दे धक्का” दिला, प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांची सुरू झालेली एकाधिकारशाही सदस्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे थांबवली गेली. जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडणारे हे सभागृह एक आयुध आहे हे सर्वच सदस्यांनी अभ्यासपूर्ण शैलीत दाखवून दिल! मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी काही विषयावर सदस्यांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन मान्य केले! जिल्हा परिषदेचा कारभार या सभागृहाच्या पाठबळामुळे आणखी गतिमान व पारदर्शक करू अशी ग्वाही देत पदाधिकारी व सदस्यांचा एका अर्थाने सन्मान केला.











