नौका कारवाईनंतर देवगडात कस्टम अधिकारी धारेवर

हेतूपुरस्कर कारवाई केल्याचा मच्छीमारांचा आरोप

कस्टमला कारवाईचे अधिकार आहेत का? मच्छीमारांचा सवाल

देवगड / प्रतिनिधी
मासेमारी करणाऱ्या देवगडमधील एका पर्सनेट नौकेवर ‘एलईडी’चे साहित्य मिळून आल्याने सिंधुदुर्गच्या सीमाशुल्क प्रतिबंधक विभागाने सदर नौका ताब्यात घेत कारवाईसाठी बंदरातील ‘कस्टम’च्या जेटीकडे आणली. परंतु कस्टम विभागाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप करीत स्थानिक मच्छीमारांनी कस्टम विभागाचे निरीक्षक पारस जैन यांना कस्टमच्या देवगड बंदर येथील कार्यालयात धारेवर धरले. कस्टमचे अधिकारी वर्दीचा धाक दाखवत हेतूपुरस्कररित्या कारवाई करीत असल्याचा आरोप उपस्थित मच्छीमारांनी केला. यावेळी देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी या प्रकरणात सामोपचाराने तोडगा काढल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

देवगड समुद्रात बुधवारी सकाळी पर्सनेट नौकेद्वारे मासेमारी करणाऱ्या येथील अक्षय हरम यांच्या नौकेवर एलईडी साहित्य कस्टम विभागाच्या गस्तीपथकाला आढळून आले. त्यामुळे सदर नौका कारवाईसाठी देवगड बंदरातील कस्टम जेटीजवळ आणण्यात आली. या नौकेवर तांडेलासह एकूण चार खलाशी होते. परंतु ही कारवाई कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करीत स्थानिक मच्छीमारांसह लोकप्रतिनिधी व मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींनी कस्टमचे निरीक्षक पारस जैन यांना जाब विचारला. यावेळी न. पं. चे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी, मच्छीमार आबा बापर्डेकर, निशाद हिरनाईक, श्रीपाद पारकर, तुषार पारकर, मिथिल भिल्लारे, नौकामालक संजय हरम, अक्षय हरम, बन्सी हरम, इलियाज होलसेकर, देवगड फिशरमेन्स सोसायटीचे अध्यक्ष द्विजकांत कोयंडे, माजी नगरसेविका श्रुती जाधव, मालवणचे मच्छीमार सोनू खंदारे, सतीश आचरेकर आदी उपस्थित होते. बुवा तारी म्हणाले, कस्टम विभागाच्या पथकाने १५ नॉटीकलच्या बाहेर सदर नौकेवर कारवाई केली आहे. असे अधिकार कस्टम विभागाला आहेत का? कस्टम विभाग सदर नौका कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडे वर्ग करणार आहे. यासाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत नौका व त्यावरील खलाशांची जबाबदारी कस्टम विभागाचे अधिकारी घेणार का? ही जबाबदारी कस्टम विभाग घेत असेल, तर तशा प्रकारचे पत्र कस्टम विभागाने लेखी स्वरुपात नौकामालकांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

अक्षय हरम म्हणाले, सदर पर्सनेट नौका सुमारे ३३ बाव खोल समुद्रात मासेमारी करीत असताना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी नौकेवर ताबा घेतला. तांडेलाला धक्काबुक्की करण्यात आली. सदर नौकेची क्षमता नसताना अतिवेगाने ही नौका कस्टम जेटीजवळ आणण्यात आली. नौकेवरील खलाशांना ताब्यात ठेवण्यात आले. त्यांना जेवणही करू दिले नाही. त्यांचे मोबाईल काढून घेत स्वीच ऑफ करण्यात आले. हे कृत्य कस्टमच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात केले? ही कारवाई कस्टम विभागाचे अधिकारी हेतूपुरस्कररित्या करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आबा बापर्डेकर म्हणाले, घटनास्थळी कस्टम विभागाने कोणताही पंचनामा केला नाही. कायदेशीर कारवाईसाठी सदर नौका मत्स्य व्यवसाय विभागाकडेच वर्ग करायची असेल, तर कस्टम विभागाने सदर नौकेवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने देवगड पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी उपस्थित मच्छीमार व कस्टम अधिकाऱ्यांची बाजू समजून घेतली. नौका ताब्यात घेतल्यानंतर कस्टम विभागाने पुढील कारवाईची प्रवि त्र्या अतिजलद गतीने राबविणे गरजेचे होते. मच्छीमारांच्या मागणीची पूर्तता करून सदर नौका मत्स्य विभागाकडे कायदेशीर कारवाईसाठी लवकरात लवकर वर्ग करावी, असे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी सांगितले. कस्टमचे निरीक्षक पारस जैन यांनी सदर नौका पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाच्या ताब्यात देईपर्यंत सदर नौकेची व नौकेवरील खलाशांची जबाबदारी कस्टम विभाग स्वीकारणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित मच्छीमारांना दिले. यावेळी देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणपती गावडे, कॉन्स्टेबल प्रतिक जाधव, संभाजी खरात, प्रसाद आचरेकर, रवींद्र महाले, भाऊ नाटेकर, होमगार्ड यांच्यामार्फत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.