भाजी धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाण्यात पडून मृत्यू
सावंतवाडी । प्रतिनिधी :
शेतातील भाजी धुण्यासाठी नदीत गेलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. मधुकर काशीराम सावंत ( ६५, रा. सांगेली ) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जात पंचनामा केला. यातील मयत हे शेतात काम करीत असताना त्यांनी घरी नेण्यासाठी भाजी काढली. ती नदीत धुण्यासाठी म्हणून गेले व पाण्यात भाजी धूत असताना अचानक त्यांना चक्कर येऊन ते थेट पाण्यात पडले. नदीला भरपूर पाणी असल्याने ते वाहत पुढे गेले त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.










