रत्नागिरी ः प्रतिनिधी
फेसबुकवरील रिल्सच्या नादी लागून वृध्दाने 9 लाख 21 हजार 701 रुपये गमावल्याची घटना ऑगस्ट 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत भाटिमिऱ्या परिसरात घडली आहे.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अमित चव्हाण (रा.उत्तरप्रदेश) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात हेमंत मारुती शिवलकर (71,रा.नवीन दत्तमंदिर भाटिमिऱ्या,रत्नागिरी) यांनी मंगळवार 14 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ऑगस्ट 2025 ते जानेवारा 2026 या कालावधीत फिर्यादींनी फेसबुक या सोशल मिडीयावर रिल्स आणि जाहिराती पाहताना त्यांची संशयित अमित चव्हाणशी ओळख झाली होती. फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर अमितने फिर्यादीला 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास 15 लाख्ा रुपये मिळतील असे आमिष दाखवले होते.
फिर्यादी हेमंत शिवलकर यांना ती 15 लाखांची रक्कम देण्यासाठी संशयिताने त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये तसेच गुगल पेच्या माध्यमातून तब्बल 9 लाख 21 हजार 701 रुपये लाटले. तसेच फिर्यादीच्या नावे असलेल्या बँक खात्यांचा वापर करुन त्यामध्ये इतर लोकांना फसवून त्यांची रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करुन नंतर ती काढून घेतली आहे. दरम्यान, फिर्यादी हे वयोवृध्द अल्याने व नियमितपणे बँकेत आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी जात नसल्याने अडीच महिन्यांनंतर बँकेकडून माहिती घेतल्यानंतर हा सर्व फसवणूकीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












