राजापूर (वार्ताहर): राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मौजे शीळ जॅकवेलला समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात नगर परिषद शिष्टमंडळासमवेत आमदार किरण सामंत यांनी शीळ ग्रामस्थांची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान आ. सामंत यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर या जलवाहिनी कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी आमदार सामंत यांनी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली.
यावेळी जॅकवेल व जलवाहिनी अंथरण्याच्या कामात येणाऱ्या अडचणी, स्थानिक पातळीवरील अडथळे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या यावर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आमदार सामंत यांनी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
बैठकीदरम्यान विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शीळ धरण प्रकल्प, अंतर्गत रस्ते तसेच अन्य विकास कामां सदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेले समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
शीळ ज्ञानसागर वाचनालयात झालेल्या या बैठकीत आमदार सामंत यांचा शीळ ग्रामस्थ व ज्ञानसागर वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आमदार किरण सामंत यांच्या मध्यस्थीनंतर शीळ येथील जॅकवे व जलवाहिनी अंथरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला गती मिळणार असून राजापूर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पामुळे भविष्यात राजापूर शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणार असून अनेक वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. नागरिकांनी देखील आमदार सामंत यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी संतोष मेहत्रे, सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, जि. प. सदस्य प्रकाश कुवळेकर, प. स. सदस्य, नगरसेवक जमीर खलिफे, पाणी पुरवठा समिती सभापती सौरभ खडपे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, शीळ सरपंच अशोक पेडणेकर यांसह रविंद्र नागरेकर, गोपाळ गोंडाळ, गणपत मोंडे, मधुकर सावंत, कृष्णा नागरेकर, नामदेव नागरेकर, रविंद्र गोंडाळ, एड. प्रविण नागरेकर, रघुनाथ भोवड, राजेंद्र बाईत, संतोष मोंडे, रमेश पेंढारी, सुरेश पळसमकर, प्रकाश भोवड, पोलिस पाटील दुर्वा पेडणेकर आदी ग्रामस्थ तसेच विविध खात्याचे अधिकारी,सर्कल श्री. कोकरे, तलाठी, ग्रामसेवक श्री. डिगुळे उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या आ. किरण सामंत यांच्या यशस्वी मध्यस्ती नंतर शीळ जॅकवेल जलवाहिनी कामाचा मार्ग...













