चिमुकल्या हातांनी बाप्पाची सेवा; धामणीत गणेशमूर्तीला दिला जातोय रंगरंगोटीचा साज

देवरूख (प्रतिनिधी):

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील लिंगायत बंधूंच्या चित्रशाळेत गणपती बाप्पांच्या मूर्तींवर रंगाचा साज चढविण्याचे काम उत्साहात सुरू आहे. या चित्रशाळेत प्राथमिक शाळेच्या सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी हेमल उल्हास लिंगायत मोठ्या भक्तिभावाने बाप्पाच्या सेवेत रमली आहे.

लहान वयातच कलेची आणि गणेशभक्तीची आवड निर्माण झालेल्या या चिमुकलीच्या हातून गणेशमूर्तींवर रंगकाम केले जात आहे. बाप्पाच्या मूर्तीला सुबक रंग देताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि एकाग्रता पाहण्यासारखी आहे.

लिंगायत कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली ही ११ वर्षीय हेमल लिंगायत गणेशमूर्ती रंगविण्याची कला आत्मसात करत असून, तिच्या या सहभागातून ‘कलेसोबत संस्कार आणि भक्तीची जोड’ असा सुंदर संदेशही मिळत आहे. तिच्या चिमुकल्या हातांनी साकारला जाणारा बाप्पाचा साज सध्या धामणी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळतेय, याचा मला खूप आनंद आहे,” अशा भावना हेमल हिने व्यक्त केली.