पावसाळ्यात नागरिकांना त्रास होता नये : योग्य पद्धतीने कामे करून घ्या : स्वच्छता सभापती पुनम चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मालवण | प्रतिनिधी : पावसाळा कालावधीत मालवण शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी गटारे व व्हाळ्यांची साफसफाई नगरपरिषदेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यावर लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून नागरिक, वाहनचालक यांना त्रास होऊ नये यां दृष्टीने नियोजन व कार्यवाही सुरु आहे.
आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी शहरातील मुख्य गटारे आणि मोठ्या व्हाळ्यांच्या साफसफाईच्या कामावर स्वतः लक्ष ठेवून आहेत .
शहरातील सर्व लहान-मोठी गटारे आणि व्हाळ्यांमधील साचलेली माती व कचरा पूर्णपणे उपसण्याच्या सक्त सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पावसाच्या पाण्याला कुठेही अडथळा निर्माण होऊन रस्ते जलमय होऊ नयेत, ही आमची प्राथमिकता आहे. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. असे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुख्य सफाई पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कामात गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला सक्त आदेश देण्यात आले आहेत.











