मळगावच्या ‘माळीच्या घरातील ‘ एकत्र कुटुंबपद्धतीचा अनोखा गणेशोत्सव 

आजही जतन होतेय साडेसातशे वर्षांची परंपरा

सचिन रेडकर । सावंतवाडी : कोकणच्या भूमीला निसर्गाचे जेवढे वरदान लाभले आहे, तितकीच समृद्ध आणि भावपूर्ण संस्कृती या मातीत रुजलेली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात परंपरा आणि भावनेची सुरेख सांगड घालून कोकण संस्कृतीचा सुगंध सातासमुद्रापार पोहोचवण्याचे कार्य येथील श्रद्धाळू जनतेने केले आहे. याच सांस्कृतिक वैभवाचे एक उत्तम प्रतीक म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील ‘माळीचे घर’. येथे गेल्या साडेसातशे वर्षांहूनही अधिक काळापासून ‘घरवडकर राऊळ’ कुटुंबीय अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करत आहेत. आजच्या आधुनिक काळात जेव्हा एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली आहे, अशा काळात राऊळ कुटुंबाच्या नवीन पिढीनेही ही अनोखी परंपरा तितक्याच निष्ठेने जतन केली आहे.

सावंतवाडी शहराच्या पश्चिम सीमेला लागून वसलेले मळगाव हे सुमारे आठ हजार लोकसंख्येचे आणि पंधरापेक्षा जास्त वाड्यांचे समृद्ध गाव. या गावाच्या मध्य भागात श्री देव रवळनाथ मंदिरालगत असलेल्या माळीच्या घरात घरवडकर राऊळ कुटुंबांची जवळपास पाचशेहून अधिक वस्ती आहे. सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री देवी माऊलीसह मळगावचे श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव मायापूर्वचारी आणि श्री देव दोन पूर्वस या चार प्रमुख देवस्थानांइतकाच मान आणि श्रद्धा गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माळीच्या घरा’ला मिळाली आहे. या घरातील मानकऱ्यांनी आणि राऊळ कुटुंबातील सर्व सदस्यांनी मनाच्या अंतर्भावापासून या देवस्थानाचे महात्म्य जोपासले आहे. त्यामुळेच हा गणेशोत्सव केवळ एका कुटुंबाचा उत्सव न राहता संपूर्ण मळगाव परिसराचे धार्मिक भूषण ठरला आहे.

सद्यस्थितीत या कुटुंबातील अनेक सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, गोवा किंवा इतर ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. परंतु कामानिमित्त दूर गेलेली ही भावंडे वर्षातील चार महत्त्वाच्या सणांना—म्हणजेच होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सवाला—आपल्या मूळ घरी आवर्जून एकत्र येतात. गणेशोत्सवाची पूर्वतयारी ही आधीच्या सणांमधील भेटींमध्येच नियोजित केली जाते. त्यामुळे उत्सवाच्या काळात कसलीही घाईगडबड किंवा गोंधळ न होता अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक विधी पार पडतात. राऊळ कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लहान-थोर सर्वजण या पारंपरिक उत्सवात सक्रिय सहभाग घेतात.

या गणपतीच्या मूर्ती निर्मितीची प्रक्रियाही अत्यंत आगळीवेगळी आणि पारंपरिक आहे. गणेशोत्सवापूर्वी येणाऱ्या पौर्णिमेला मूर्तीसाठी माती आणली जाते आणि चतुर्थीच्या आदल्या आठवड्यात मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. राऊळ कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्या हातांनी ही मूर्ती घडवतात, तर तरुण आणि लहान मुले या कामात आवडीने हातभार लावतात. अमावस्येपासून मूर्तीला रंगकाम केले जाते. या गणपतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चतुर्थीच्या पहाटेला केली जाणारी मूर्तीच्या डोळ्यांची रेखणी अर्थात ‘नजर’. सध्या त्यांचे नातेवाईक जगन्नाथ उर्फ बाबलं राणे हे मूर्तीकार हे अत्यंत कुशलतेने ही नजर साकारतात. चतुर्थीच्या पहाटे श्रींचे डोळे रेखल्यानंतरच मूर्तीमध्ये जणू साक्षात चैतन्य अवतरते.

माळीच्या घरातील गणेशोत्सव हा सात दिवसांचा असतो. चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर ११ वाजता महाआरती होते. यावेळी घरातील सर्व सदस्य महाआरतीला उपस्थित असतात. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक घरातून गणपतीसाठी नैवेद्याचे पान आणले जाते. महिला रांगेत उभ्या राहून मुख्य पाच पानांवर नैवेद्य वाढतात आणि अशा प्रकारे सात वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्याचा प्रसाद दाखवला जातो. यानंतर सर्व कुटुंबीय एकत्र बसून सामूहिक म्हणजेच सहभोजनाचा आनंद लुटतात.

या उत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आरती तसेच भजनांसोबतच . उत्सवाच्या सात दिवसांत दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी नृत्य स्पर्धा, दररोज सायंकाळी फुगड्या, आरती आणि भजनाचे सूर यांमुळे संपूर्ण घर भक्तीरस आणि उत्साहाने न्हाऊन निघते.

सात दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर सातव्या दिवशी श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. ही मिरवणूक अत्यंत नयनरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. लाकडी वाशांच्या चौकटीवर मूर्ती ठेवून, चोवीस जणांच्या खांद्यावरून भातशेतीतून ही मूर्ती नदीकाठी नेली जाते. ढोल-ताशांच्या गजरात आणि राऊळ बांधवांच्या तालावर चालणाऱ्या या मिरवणुकीत परिसरातील शेकडो ग्रामस्थ सामील होतात. सायंकाळी उशिरा भक्तीमय वातावरणात बाप्पाला अश्रूभऱ्या डोळ्यांनी भावपूर्ण निरोप दिला जातो. विसर्जन सोहळ्यानंतर पुन्हा सर्वजण एकत्र येऊन महाप्रसाद घेतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येण्याची आस उराशी बाळगून आपापल्या कर्मभूमीत परततात. एकत्र कौटुंबिक सौहार्द, संस्कृती आणि श्रद्धेचा हा साडेसातशे वर्षांचा वारसा आजही तितक्याच तेजाने मळगावच्या माळीच्या घरात तेवत आहे.