शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती – हर्षदा वाळके

असलदे गावात लोकप्रतिनीधी भातपिक शेतक-यांच्या बांधावर ; नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे तातडीने करा

कणकवली:अल निनोच्या वादामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील आम्ही शेतक-यांच्या बांधावर जात आहोत. भातपीक नुकसानग्रस्त गावांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असलदे गावातील शेतक-यांच्या बांधावर गेलो. भीषण अशी परिस्थिती दिसून येत आहे. शेतक-यांची वर्षभराची भातपीकाची बेगमी ही पूर्णपणे नष्ट झाल्याची भिती शेतक-यांच्या डोळ्यात दिसत असल्याची प्रतिक्रिया सभापती हर्षदा वाळके यांनी दिली.

दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात असलदे गावातील भातपीक नुकसाग्रस्त शेतक-याच्या बांधावर सभापती हर्षदा वाळके , जिल्हा परिषद संतोष पारकर, सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके या लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधत येत असलेल्या अडचणीबाबत चर्चा केली. यावेळी असलदेत गावठणवाडी , डामरेवाडी , मधलीवाडी , धनगरवाडी, तावडेवाडी या भागातील भातशेतीची पाहणी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, ग्रा.प.सदस्य आनंद तांबे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, संतोष परब , बाबाजी शिंदे , प्रविण डगरे , अनिल नरे, मायाजी नरे, विजय खरात, विजय डामरे , विजय परब, वासुदेव दळवी, शेतकरी विनायक परब, विश्वनाथ परब, बाळा खरात , दिनेश तावडे, विजय आचरेकर, महेंद्र हडकर, ग्रामसेवक संजय तांबे, ग्रा.प. कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी, आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हर्षदा वाळके यांनी असलदे गावातील सर्व शेतक-यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, अशा सुचना दिल्या.

जि.प.सदस्य संतोष पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतक-यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करावी अशा सुचना केल्या. त्यानुसार असलदे गावातील भातशेतीची पाहणी केली असता बिकट परिस्थिती आहे. शेतीत पिक न मिळाल्यास पुढील वर्ष कसे काढायचे ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

भगवान लोके म्हणाले, असलदे गावातील शेतक-यांचे कमी पावसामुळे भातशेती उध्दवस्त झाली आहे. पुढील वर्षभराची भाताची असलेली बेगमी पुर्णत: नष्ट झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधी म्हणून आम्ही सर्वजण शेतक-यांना भेटून त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने बांधावर गेलो. भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. असलदे गावातील सर्व शेतक-यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडली.