रत्नागिरी : बालकांमध्ये होणाऱ्या न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे तसेच बाधित बालकांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत जिल्ह्यात ‘SAANS अभियान २०२६-२७’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. १२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
न्यूमोनिया हा बालकांमधील आजार व बालमृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, आजाराची लक्षणे लवकर ओळखणे आणि वेळेत प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून विविध जनजागृती व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
न्यूमोनियाची लक्षणे ओळखा
बालकाला जलद श्वासोच्छ्वास होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे, खोकला येणे, दूध किंवा अन्न घेण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. विशेषतः लहान बालकांमध्ये या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
न्यूमोनियापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय:
अभियानांतर्गत बालकांचे संपूर्ण लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण करणे, जन्मानंतर पहिल्या एक तासात स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान करणे, सहा महिन्यांनंतर पूरक आहार सुरू करणे, बालकांना योग्य प्रमाणात पोषण आहार देणे, हातांची स्वच्छता राखणे तसेच घरातील व परिसरातील हवा प्रदूषणमुक्त ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
विविध माध्यमांतून जनजागृती:
ग्रामसभा, माता बैठका, अंगणवाडी केंद्रे, ग्रामआरोग्य स्वच्छता व पोषण दिवस, शाळा तसेच सोशल मीडिया, पोस्टर्स, व्हिडिओ संदेश आणि ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत न्यूमोनियाच्या प्रतिबंध व उपचारासंबंधी माहिती पोहोचविण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या बालकांना वेळेत आरोग्य संस्थेत संदर्भित करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
‘न्यूमोनिया नाही, तर बालपण सही’ या संदेशातून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालक, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधून तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वतीने करण्यात येत आहे.











