BREAKING : १७ दिवसांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील तीन आरोपींना खेड पोलिसांनी केली अटक

खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात घडलेल्या खून प्रकरणातील १७ दिवसांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.

दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तानजवळील रस्त्यावर ही घटना घडली होती. फिर्यादी यांचे सख्खे चुलत भाऊ शफी अब्दुल्ला वरवटकर (वय ५५) यांच्यावर जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी हल्ला केला होता. आरोपी अशरफ महमूद बोट, गणी इस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे यांनी शिवीगाळ करत जुन्या वादाचा राग मनात ठेवून शफी वरवटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

शफी वरवटकर यांची यापूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याची माहिती आरोपींना असूनही त्यांनी त्यांच्या छातीवर आणि शरीरावर वारंवार मारहाण केली. हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत शफी वरवटकर यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(३), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कादिर शमशुद्दीन घारे (वय ४८), गणी इस्माईल बोट (वय ५४) आणि अशरफ महमूद बोट (वय ५५) हे तिघेही फरार होते. सर्व आरोपी हे मेटे मोहल्ला, पोस्ट असगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.

खेड पोलिसांनी आरोपींचा सर्वत्र शोध घेतला होता. दरम्यान, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपी खेड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खेड एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांनाही पकडले. रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. जी. महामुनी आणि खेड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पो.कॉ. ४४० विकास पवार आणि पो.कॉ. ३४५ सुरज मोरे यांनी ही यशस्वी कारवाई केली. आरोपींना अटक झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून खेड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.