हापूस आणि काजू पिकाला वाचवण्यासाठी बागायतदारांची धावपळ

कोकणात अवेळी पावसाचे सावट

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कडाक्याच्या उन्हामुळे तापमानाचा पारा ३४ ते ३७ अंश सेल्सिअसवर गेला असतानाच, आता अवेळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, २४ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू पिकाला बसण्याची शक्यता असल्याने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना तातडीने सावधगिरीचे उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.

काढणीसाठी ‘नूतन’ झेल्याचा वापर आणि सुरक्षित साठवणूक पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे (४०-५० किमी प्रति तास) तयार झालेल्या फळांचे नुकसान टाळण्यासाठी बागायतदारांनी काढणीस तयार असलेला हापूस आंबा आणि काजू बियांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी. आंब्याची फळे झाडावरून काढताना ती देठासह ‘नूतन’ झेल्याच्या साहाय्याने काढावीत, ज्यामुळे फळांना इजा होणार नाही. काढलेली फळे आणि काजू बिया उन्हात न ठेवता तातडीने सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी हलवाव्यात. उष्णतेमुळे होणारा ‘साका’ टाळण्यासाठी काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतरच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भाजीपाला व कडधान्य पिकांचे नियोजन केवळ फळबागाच नव्हे, तर भाजीपाला उत्पादकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. मिरची, वांगी, टोमॅटो आणि भेंडी यांसारख्या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्यास ती पावसामुळे खराब होण्यापूर्वीच करून घ्यावी. मुगाच्या पिकाबाबत सल्ला देताना कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, शेंगा पक्व झाल्या असल्यास (पेरणीनंतर ६०-७० दिवसांनी) त्यांची तोडणी करून घ्यावी, जेणेकरून पावसाने शेंगा तडकणार नाहीत. तसेच, नवीन लागवड केलेल्या कलमांना आणि रोपांना सोसाट्याच्या वाऱ्यापासून वाचवण्यासाठी काठीचा आधार देणे आवश्यक आहे.

पशुधनाचे वादळापासून संरक्षण वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होत असताना जनावरे कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली बांधू नयेत, त्यांना सुरक्षित गोठ्यातच ठेवावे. वाढत्या तापमानामुळे जनावरांना दिवसभर पुरेसे स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे आणि उन्हाचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्यात गूळ (१%) व मीठ (०.५%) यांचे मिश्रण वापरावे. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी शेडच्या खिडक्या झाकून पक्ष्यांचे संरक्षण करावे.