वेळणेश्वरमध्ये पोस्टमनने दीड वर्षात टपाल वितरितच केले नाही!

दोन पोती भरलेली टपाले घरात सापडली

गुहागर प्रतिनिधी:

तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेले दीड वर्ष पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरित केली नसल्याची खळबळजनक घटना येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रुजू झालेल्या पोस्टमास्तराने केलेल्या पाठपुराव्यात गुरुवारी उघडकीस आली आहे.

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करण थोरात नामक पोस्टमन आहे. येथील ग्रामस्थांकडून आपल्यासाठी आलेली टपाले मोबाईलवर ट्रॅकिंग रिपोर्ट आला असताना आपल्यापर्यंत का पोहोचत नाहीत, म्हणून वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात विचारणा सुरू केली. अशातच वेळणेश्वर पोस्ट ऑफिसमध्ये नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी पोस्टमन करण थोरात याच्याकडे विचारणा सुरू केली. मात्र त्यावर पोस्टमन काहीच उत्तर देत नव्हता. अखेर पोस्टमनच्या घरी जाऊन पाहिले असता दोन पोती भरलेली टपाले आढळून आली.

पोत्यामध्ये बँकांच्या लिलाव नोटीस, पासबुके, चेकबुक, आधारकार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी सर्टिफिकेट, हायस्कूल तसेच महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठातून आलेली पत्रे आदी दीड वषपिक्षा जास्त कालावधीमधील टपाले मिळून आली.