छत्रपती संभाजीनगरमधील मिटमिटा परिसरात पोलिसांनी कुख्यात डॉन बाबा फरजानच्या आलिशान बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 21 तास चाललेल्या या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड, सोन्याचे दागिने आणि शस्त्रे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. रोकड मोजण्यासाठी पाच नोट मोजणी मशीनचा वापर करण्यात आला. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली.
21 तासांच्या कारवाईत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : मिटमिटा परिसरातील कुख्यात बाबा फरजान डॉनच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. शहर पोलिस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुमारे 21 तास चाललेल्या या तपासणीत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले.
पोलिसांनी बंगल्याची सखोल झडती घेतल्यानंतर दोन खोल्यांमधून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड आढळून आली. ही रोकड मोजण्यासाठी पाच नोट मोजणी मशीन मागवण्यात आल्या. पोलिसांना 50 रुपयांच्या नोटांच्या बंडलांसह मोठ्या प्रमाणात चलन सापडल्याची माहिती मिळाली आहे.
सोन्याचे दागिने आणि शस्त्रसाठाही जप्त
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 5 कोटी रुपयांची रोकड, 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची भांडी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय 4 रायफल, सुमारे 500 काडतुसे, तलवारी आणि चाकू असा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली होती. छाप्यापूर्वी काही विश्वासू अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाचा तपशील आणि त्याच्या स्रोताबाबत पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अन्य एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या ठिकाणीही कारवाई करण्यात आली असून तेथे मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने सापडल्याची माहिती आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.











