वराड सदस्य पदी वर्षा मिठबावकर तर धामापूर सदस्य पदी आसावरी भोसले विजयी : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत पोट निवडणुक
मालवण | प्रतिनिधी : चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर यांनी बहुमताने विजय मिळवला. तर वराड आणि धामापूर येथे सदस्य पदासाठी झालेल्या लढतीत वर्षा मिठबावकर आणि आसावरी भोसले विजयी झाल्या. वराड ग्रामपंचायत सदस्य पदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकित वर्षां मिठबावकर यांनी 4 मतांनी विजय मिळवला.
मंगळवारी मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पोटनिवडणुक पार पडली. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी झालेल्या पोट निवडणुकीत शिवप्रसाद चौकेकर यांनी बहुमतांनी विजय मिळवला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकाने पराभव केला. शिवप्रसाद चौकेकर यांना ४९० मते (विजयी), अशोक चौकेकर यांना ९५ मते तर नोटा २१ मते पडली. नवनिर्वाचित सरपंच शिवप्रसाद चौकेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे, तसेच गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान केल्याने माझा विजय निश्चित झाला. चौके गावचा सर्वांगीण विकास सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांचे आभार व्यक्त केले.
वराडमध्ये सदस्य पदासाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे वर्षा प्रदीप मिठबावकर यांनी संजना चव्हाण यांचा अवघ्या ४ मतांच्या फरकाने पराभव केला. वर्षा मिठबावकर यांना २८४ मते (विजयी), संजना चव्हाण यांना २८० मते तर नोटा ७ मते मिळाली.
धामापूरमध्ये आसावरी भोसले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय निश्चित केला. आसावरी भोसले यांना १५० मते (विजयी), जागृती भोळे यांना ७४ मते तर नोटा १ मत मिळाले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी तहसीलदार गणेश लव्हे, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर आणि सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.










