महिलांनी उद्योग व्यवसायातून आत्मनिर्भर व्हावे! जि. प. सदस्य सुनील पारकर यांचे प्रतिपादन.

 हिंदळे येथे मसाला प्रक्रिया युनिटचे लोकार्पण

मसुरे | झुंजार पेडणेकर महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.
​ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग व्यवसायातून स्वतंत्र ओळख निर्माण करावी. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन जी प सदस्य सुनिल पारकर यानी हिंदळे येथे केले. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे उपजीविकेचे स्रोत अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने उमेद अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या हिंदळे येथील भैरवी स्वयंसहाय्यता समूहाला वनराई फाउंडेशनच्या माध्यमातून मसाला प्रक्रिया युनिट उपलब्ध करून देण्यात आले. या युनिटच्या माध्यमातून हिंदळे येथे सुरू केलेल्या ‘भैरव मालवणी मसाला’ गृहउद्योगाचा शुभारंभ जि. प. सदस्य सुनील पारकर व पं. स. उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते करण्यात आले.

​हिंदळे सरपंच (प्रशासक) मकरंद शिंदे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक हेमंत हळदणकर, वनराई फाउंडेशनच्या प्रतिनिधींसह भैरवी स्वयंसहायता समूहातील महिला, हिंदळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अमोल लोके म्हणाले, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
​वनराई फाउंडेशनमार्फत देण्यात आलेल्या मसाला प्रक्रिया युनिटचे एकूण मूल्य तीन लाख रुपये आहे. उमेद अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहामधील महिलांना विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग क्षेत्राशी कृतीसंगम घडवून आणत व्यवसायाच्या संधी निर्माण करणे, उपजीविका अधिक शाश्वत आणि सक्षम करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्याच अनुषंगाने भैरवी स्वयंसहायता समूहाला प्राप्त झालेले मसाला प्रक्रिया युनिट महिलांच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे सरपंच मकरंद शिंदे यांनी सांगितले.

​’भैरव मालवणी मसाला’ गृहउद्योगाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर दर्जेदार मालवणी मसाल्याचे उत्पादन होणार आहे. त्यातून समूहातील महिलांना रोजगार, उत्पन्नवाढ आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे. महिलांच्या सामूहिक प्रयत्नातून उभा राहिलेला हा उद्योग ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी हिंदळे ग्रामसंघ अध्यक्षा शीतल गिरकर, समता राणे व मानवी राणे यांनी विशेष प्रयत्न केले. ​