कोलगाव नाईकबाग रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

सावंतवाडी | प्रतिनिधी  : कोलगाव नाईकबाग परिसरातील मुख्य रस्त्यावर सध्या कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या बेफिकिरीने फेकल्या जात आहेत. यामुळे परिसराची स्वच्छता पूर्णतः बिघडली असून दुर्गंधी पसरली आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी कचरा जाळण्यात आल्याचेही दिसून येत आहे, ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, जवळील चिकन शॉपमधील सडलेला कचरा देखील याच ठिकाणी टाकला जात असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या मार्गावरून ये-जा करणे नागरिकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. दुर्गंधी, घाण आणि विखुरलेला कचरा यामुळे पादचाऱ्यांना नाक दाबून चालावे लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
याठिकाणी ग्रामपंचायतीने ‘कचरा टाकू नये’ असा फलक लावला असला, तरी प्रत्यक्षात त्या फलकाचाच अवमान होत असल्याचे चित्र आहे. फलकाजवळच कचऱ्याचे ढीग साचले असून ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रहिवाशांची मागणी:
कचरा तात्काळ हटवून परिसर स्वच्छ करावा
नियमित साफसफाईची व्यवस्था करावी
कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी
सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नजर ठेवावी
परिसरातील वाढती अस्वच्छता आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्यधोके लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी नाईकबाग येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.