‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ने श्रीमती अश्विनी मोरे या सन्मानित

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. हा पुरस्कार आपल्या भाकर सेवा संस्थेच्या सचिव श्रीमती अश्विनी मोरे यांना प्राप्त झाला आहे. अश्विनीताई पहिली – दुसरीच्या वर्गात असल्यापासून गावोगावच्या जत्रा मेळाव्यातून उत्तम गाणी गाऊन व नाचून भाकर या संस्थेच्या उभारणीच्या काळात मदत करत असत. ज्यातून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या जेवणासाठीच्या खर्चाचा काही भाग हलका व्हायचा. हीच अश्विनीताई पुढे संस्थेच्या प्रत्येक कार्य हिरीरीने भाग घेऊ लागली. आई स्वर्गवासी.अरुणा पाटील यांना समाजसेवा करीत महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त करताना केलेल्या समाजसेवेची व परिश्रमाची जाण मनात ठेवून आईचा वारसा चालवण्याचा ध्यास त्यांनी मनात ठेवून संस्थेच्या कामकाजाला गती दिली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी १५ पदयात्रा काढल्या. महिला बचत गट ,बाल संगोपन ,गुजरात भूकंप आदी प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले.
शिक्षणातहीत्या मागे राहिलेल्या नव्हत्या संस्थेचे काम करीत त्यांनी वाणिज्य शाखेची मुंबई विद्यापीठातून प्रथम वर्गाची पदवी मिळवलेली. पुढे एम.एस.डब्ल्यू ही समाजसेवेची पदवीत्तर पदवी मिळवली पुढील तीन वर्ष म्हाडामध्ये झोपडपट्टी विकास कार्यक्रमात काम केले. बाहेर उत्तम पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध असूनही आजही अल्पशा मानधनावर त्याती समाजसेवेचे कार्य करीत आहे.
सन २०१२ मध्ये पुन्हा भाकर या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोकणातील गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करावे याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली. संस्थेच्या समुपदेशक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक म्हणून काम करीत आजवर दोन हजारहून अधिक पीडित महिलांना मदत केली. तसेच रत्नागिरी जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग,मुंबई., महिला तक्रार निवारण कमिटीच्या सदस्य पद , कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अन्याय अत्याचार POSH कमिटी मध्ये अनेक शासकीय कार्यालये तसेच कंपनी मध्ये सदस्य पद, व्यसनमुक्ती समिती, कलेक्टर ऑफिस येथे सदस्य पदाची जबाबदारी अश्विनीताई सांभाळत आहेत.
भाकर गेली ३३ वर्ष कोकणात अविरत काम करणारी संस्था असून संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी अश्विनीताईनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. संस्था शासनाचा स्वच्छ भारत मिशन, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण प्रकल्प, महिला व बालकांसाठी समुपदेशन केंद्र ,पाणलोट विकास कार्यक्रम, हस्तकला कारागिरांचे प्रशिक्षण प्रकल्प, वन स्टॉप सखी सेंटर, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल ,वृद्धाश्रम (आजी-आजोबांचे गाव), महिला पुनरुत्थान केंद्र इत्यादी प्रकल्प कार्यक्रम राबवीत आहे.