शंभरी गाठलेल्या यशोदा आजींचा पावणादेवीवाडीत उत्साहात सत्कार

कणकवली (प्रतिनिधी):तालुक्यातील पावणादेवीवाडी येथील वयोवृद्ध आजी श्रीमती यशोदा शेलार यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली आहे. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून ब्राह्मण देव सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

मंडळाच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण पूजेच्या मंगल दिनी हा विशेष सोहळा पार पडला. एका शतकाचा प्रवास पूर्ण केलेल्या यशोदा आजींचा सत्कार आणि वाढदिवस अत्यंत उत्साही व कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. वयाच्या शंभराव्या वर्षीही आजींचा उत्साह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

याप्रसंगी ब्राह्मण देव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पावणादेवीवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आजींचे अभिनंदन करून त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने संपूर्ण वाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.