माजी मुख्याध्यापक म्हणून बजावली होती प्रदीर्घ सेवा
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी येथील ‘सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे’ संस्थेचे सहसचिव आणि जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. सुलेमान अब्दुलकादीर बेग (वय ७३) यांचे सोमवार, ४ मे रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या सावंतवाडी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह मुस्लिम समाजात मोठी शोककळा पसरली आहे.
सुलेमान बेग यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ योगदान दिले होते. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरणासाठी व्यतीत केले. ‘सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे’ या संस्थेच्या सहसचिव पदाची धुरा त्यांनी अत्यंत सक्षमपणे आणि पारदर्शकपणे सांभाळली होती. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
शैक्षणिक संस्थांशी अतूट नाते
केवळ मर्कझी जमातच नव्हे, तर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या विकासातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
ते सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीचे सदस्य, सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या शालेय समितीचे सदस्य, तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कार्यतत्परतेमुळे ते शिक्षण क्षेत्रात तसेच संपूर्ण परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. एक अनुभवी मार्गदर्शक आणि निष्ठावान समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.












