मालवण पोलिसांची धडक कारवाई सुरूच!

धुरीवाडा येथे अवैध दारूविक्रीवर छापा

गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांची दारू जप्त; एकावर कारवाई

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, शहरातील धुरीवाडा परिसरात छापा टाकून गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५६ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर २०२६) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दिलीप नारायण हडकर (रा. धुरीवाडा, मालवण) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

 

मालवण शहरासह परिसरातील अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच मोहिमेअंतर्गत धुरीवाडा येथे अवैध दारूविक्री होत असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गोवा बनावटीचा १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

 

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार व पोलीस कॉन्स्टेबल सुमिता चव्हाण यांच्या पथकाने सहभाग घेतला.

 

गेले काही दिवस मालवण पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या मालिकेत धुरीवाडा येथील ही आणखी एक कारवाई ठरली आहे.