सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टच्या
कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्षांची ग्वाही
ज्येष्ठ कलाकारांच्या निवासासाठी सावंतवाडीत १ एकर जागा देण्याची मोठी घोषणा
मुंबई:चित्रपट क्षेत्रातील चंदेरी दुनियेत चमकणाऱ्या कलाकारांचे पडद्यामागचे आयुष्य अनेकदा संघर्षाने भरलेले असते. वय वाढल्यानंतर आणि प्रसिद्धीचा काळ ओसरल्यानंतर अनेक ज्येष्ठ कलाकारांना आणि कामगारांना सामाजिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा ज्येष्ठ कलाकारांच्या आणि चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत दिले.
सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या उभारणीत आणि ‘चिंटा’ (CINTAA) टॉवरच्या कामात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहिती फलकांचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य आणि दारासिंह यांसारख्या महान कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
*सावंतवाडीत स्वतःची १ एकर जागा देणार*
ज्येष्ठ कलाकारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या निवासाच्या सोयीसाठी रवींद्र चव्हाण यांनी यावेळी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. “ज्येष्ठ कलाकारांच्या उपक्रमांसाठी मी कोकणातील केसरी (सावंतवाडी) येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे,” असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या औदार्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना हक्काचा आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१० हजार कलाकारांच्या प्रश्नांची दखल
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो काळ ओसरला की सरत्या काळात त्या कलाकारांकडे कोणीही लक्ष देत नाही. सध्या अभिनय क्षेत्रात असे सुमारे ९ ते १० हजार कलाकार आहेत, ज्यांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे आहे. यामध्ये केवळ अभिनेतेच नव्हे, तर तंत्रज्ञ आणि इतर कामगारांची संख्याही मोठी आहे. या सर्वांना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री व CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू, संस्थेच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे चित्रपट क्षेत्रातील गरजू आणि ज्येष्ठ घटकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












