अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास खेड न्यायालयाचा निकाल

खेड (प्रतिनिधी):
लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणात खेड येथील न्यायालयाने आरोपी रोहन शंकर पालकर (वय २३, रा. खारी-सुसेरी, ता. खेड) याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. पी. एस. चांदगुडे यांनी ६ मे २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

ही घटना कोविड काळातील आहे. पीडित बालिका शालेय विद्यार्थिनी असून, ऑनलाईन क्लाससाठी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपी रोहन पालकर याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. या भीतीपोटी पीडिता बराच काळ गप्प राहिली. मात्र, शारीरिक बदलांमुळे आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी धरले. यामध्ये कलम ३७६ व पोक्सो कलम ४, ६ अंतर्गत: २० वर्षे सश्रम कारावास आणि ५०००/- रुपये दंड. (दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास).
तसेच पोक्सो कलम ८, १० आणि १२ अन्वये अनुक्रमे ३ वर्षे, ५ वर्षे आणि १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडितेने दिलेली साक्ष आणि वैद्यकीय तपासणीतील DNA अहवाल हे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरले. सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोनाली झेंडे यांनी केला, तर कोर्ट पैरवी म्हणून चंद्रमुनी ठोके यांनी सहकार्य केले. न्यायालयाने सर्व पुराव्यांचा साकल्याने विचार करून आरोपीला या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवले. या निकालामुळे समाजात एक कडक संदेश गेला असून पीडितेला न्याय मिळाला आहे.