रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांच्या विरोधात कठोर भूमिका घेत, आज मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या स्पष्ट निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) “ब्राऊन हेरॉईन” सदृश्य अमली पदार्थ विकणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले आहे.
आज, २४ जुलै २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील LCB पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला, राजीवडा येथे दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना आढळले.
पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांची चौकशी केली. पंचांच्या समक्ष त्यांच्या ताब्यातील पिशवी तपासली असता, त्यात धक्कादायकपणे “ब्राऊन हेरॉईन” सदृश्य अमली पदार्थाच्या एकूण १७५ पुड्या आणि इतर विक्रीसाठी आणलेले साहित्य आढळून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून ११ ग्रॅम वजनाचे “ब्राऊन हेरॉईन” आणि इतर मुद्देमाल असा एकूण ९०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि त्यांच्या टीममधील खालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे:
* श्रेणी. पो.उप.नि. श्री. संदीप ओगले
* स.पो.फौ. ११८८ सुभाष भागणे
* पो. हवा. २५१ शांताराम झोरे
* पो. हवा. ४७७ नितीन डोमणे
* पो. हवा. ३०१ बाळू पालकर
* म.पो. हवा. ११४७ वैष्णवी यादव
* पो. हवा. १३६२ भैरवनाथ सवाईराम
* पो. हवा. १४१० सत्यजीत दरेकर
* पो. हवा. २६५ योगेश नार्वेकर
* पो. हवा. २८८ विनायक राजवैद्य
* चालक पो.कॉ. २१५ अतुल कांबळे











