रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या खेडशी येथे सोबत राहणार्या मित्रानेच मोबाईल,दुचाकी लांबवली.तसेच त्या मोबाईलचा वापर करुन मित्राच्या बँक खात्यातून 33 हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना बुधवार 2 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत अकरम शेख (मुळ रा.पनवेल सध्या रा.खेडशी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे. त्याच्या विरोधात दिपक चंपालाल चौधरी (33,मुळ रा.खंडवा मध्यप्रदेश सध्या रा.एकता नगर खेडशी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,हे दोघेही खेडशी येथे एकत्र राहतात. बुधवारी दुपारी दिपक चौधरी हा झोपलेला असताना ती संधी साधत अकरम शेखने त्याचा मोबाईल तसेच दुचाकी (एमएच-08-यु-2831) घेउन पसार झाला. त्यानंतर त्याने दिपकच्या चोरलेल्या मोबाईलचा वापर करुन त्याच्या बँक खात्यातून 33 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.












