चिपळूण (प्रतिनिधी) : आपल्यातील अंतर्भूत कलेला सरावाची,स्पर्धेची जोड मिळाल्यानंतर ती परिपूर्ण कलाकृती निर्माण होते.रंगभूमीवर अथवा कोणत्याही कलेची साधना बालपणापासून झाली तर दीर्घकाळ आपण त्यातील आनंद घेऊ शकतो .सुट्टीत बालमनावर केलेले संस्कार आयुष्याची शिदोरी बनू शकते असे विचार महानिर्मिती अधीक्षक अभियंता संतोष चव्हाण यांनी मांडले. महानिर्मिती जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांच्या उपस्थितीत एश-प्रिया अकादमी आयोजित बालनाट्य शिबिर समारोप प्रसंगी ते बोलत होते.
पोफळी येथे बालनाट्य दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अकादमीकडून पूर्ण झाल्यानंतर दोन बालनाट्य सादरीकरण प्रसंगी त्यांनी पालक आणि बालकांच्या उत्साहाचे कौतुक केले. प्रशिक्षित मुलामुलींनी आत्मविश्वासाने सादर केलेला पहिला प्रयोग त्यांचे पहिले पाऊल ठरणार असून अभिनेते मंगेश डोंगरे, दिपेश घाणेकर, उदय भोसले यांनी दिलेले सखोल प्रशिक्षण मुलांना योग्य मार्गावर नेईल असा विश्वास क्रीडासंघटक व पत्रकार संजय सुर्वे यांनी व्यक्त केला.गायक,चित्रकार,नाट्य परीक्षक श्रीराम पवार यांनी रंगभूमीवरील अनेक बाबींना स्पर्श करत बालकलाकारांना मार्गदर्शन केले. राजेंद्र सुतार, अशोक सागवेकर, प्रशांत कुडाळकर, नाट्य परिषद सदस्य छाया पोटे, सुनीता परमाणे, उदय पोटे यांचे सहकार्य लाभले. पोफळीवासीय रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.












