समाज प्रबोधनासोबत जनजागृती निर्माण व्हावी हेच स्पर्धेचे ध्येय- गिरीश कुलकर्णी

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत पेढे परशुराम प्रशालेचे अंतिम मूल्यांकन संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६ अंतर्गत अंतिम मूल्यांकन प्रक्रिया उत्साहात पार पडली. यावेळी राज्यस्तरीय समितीने शाळेला भेट देऊन स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले.
या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी गांधी तीर्थ रिसर्च फाउंडेशन, जळगावचे राज्यस्तरीय समन्वयक गिरीश कुलकर्णी, संजय जाधव व विश्वजीत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. माळी यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. माळी यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता, आरोग्य आणि गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेअंतर्गत वर्षभरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. समितीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेसंदर्भातील उपक्रमांविषयी प्रश्न विचारले तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. यानंतर समितीने शाळेतील स्वच्छता मोहिम, पर्यावरणपूरक उपक्रम, परिसर स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची पाहणी केली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी गिरीश कुलकर्णी यांनी “समाज प्रबोधनासोबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. माळी व पर्यवेक्षिका सौ. माळी यांचा ग्रंथ व सूताचा हार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट समन्वय आणि सांघिक प्रयत्नांमुळे मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तसेच उपस्थित सर्व स्टाफला गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव येथे भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले.