“मागेल त्याला काजू कलमे” पीएमकेएसवाय योजनेअंतर्गत लाभ

प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य

शिरगाव (प्रतिनिधी) :शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देण्यासाठी तसेच काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत “मागेल त्याला काजू कलमे” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात येत असून निवड “फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह” तत्वावर करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय फळरोप वाटिकेतून मोफत काजू कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलवर अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी अथवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ०.०५ हेक्टर ते कमाल ०.२५ हेक्टर क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यानुसार १० ते ५० काजू कलमे वितरित करण्यात येणार आहेत.

अर्ज करताना लागवड क्षेत्राचा ७/१२ उतारा अथवा वनपट्टाधारकाचा दाखला, लाभार्थीचा विनंती अर्ज (प्रपत्र-अ) तसेच हमीपत्र (प्रपत्र ब१ व ब२) आवश्यक आहे. फार्मर आयडीद्वारे अर्ज केल्यास ७/१२ उतारा अपलोड करण्याची आवश्यकता नसून आधार क्रमांकाद्वारे अर्ज केल्यास ७/१२ उतारा अपलोड करावा लागणार आहे. संबंधित प्रपत्रे महा ई-सेवा केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड यांच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.