हरकुळ खुर्दच्या ललित रासमची सातासमुद्रापार ‘सूरमयी’ भरारी : अरेबिक सुरांना भारतीय वादनाची साथ
कणकवली (प्रतिनिधी): कलेच्या प्रांतात भाषा आणि देशांच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय नुकताच ओमानमध्ये आला आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द (मोहोळवाडी) येथील सुपुत्र ललित रासम ऊर्फ ‘बंडू’ याने सातासमुद्रापार ओमान देशात आपल्या भारतीय संगीत कलेचा झेंडा अभिमानाने रोवला आहे. ओमानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात पारंपरिक ओमानी पोशाखात वादन सादर करत त्याने उपस्थितांची मने जिंकली.ओमानच्या राष्ट्रीय दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी ललित रासम याला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. अरेबिक गाण्यांची आणि संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला ललितने या कार्यक्रमात सहभागी होण्यास संकोच व्यक्त केला होता. मात्र, आपल्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांचा आग्रह आणि थेट कंपनीच्या सीईओंचे आदेश मिळाल्यानंतर त्याने हे आव्हान स्वीकारले.
कार्यक्रमाच्या दिवशी ओमानचा पारंपरिक पोशाख परिधान करून ललितने मंचावर हजेरी लावली आणि आपल्या वादन कौशल्याने अरेबिक सुरांना अशी काही साथ दिली की उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
ललित ऊर्फ बंडू हा अष्टपैलू कलाकार असून बासरी, पखवाज, तबला आणि गायन या चारही कलांमध्ये तो निपुण आहे. कोकणातील मातीत रुजलेल्या त्याच्या याच कलागुणांमुळे परदेशातही त्याला मानाचे स्थान मिळाले आहे. परक्या देशात आणि अपरिचित भाषेतील संगीतासाठी एका भारतीय कलाकाराला मानाने आमंत्रित केले जाणे, ही हरकुळ खुर्द गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.कलेला जात, धर्म किंवा प्रांताचे बंधन नसते, हेच ललितने आपल्या कलेतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल हरकुळ खुर्द, मोहुळवाडीसह पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













